लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहात शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा असताना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप आहे की, सभेच्या अजेंड्यातील 1 ते 28 क्रमांकापर्यंतच्या विषयांवर कोणतीही सविस्तर चर्चा न करता ते घाईघाईने मंजूर करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांतच सभा गुंडाळून महापौर सभागृहातून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आला.
विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार, लातूर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि इतर मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असताना त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांचा अवमान झाल्याची भावना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली.
याशिवाय, माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विषयालाही सभागृहात चर्चेसाठी न आणल्याबद्दल विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लातूरच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महत्वाच्या नेत्याच्या विषयावर चर्चा न होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले.
याच सर्व गोष्टींचा निषेध करत आज लातूर गांधी चौक येथे भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर मनपामध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आणि महापौर तसेच लातूर शहराच्या आमदार अमित देशमुख यांचा आज जाहीर निषेध नोंदवला आहे.
Latur, Latur | Aug 6, 2026