महाबळेश्वरमध्ये ५०९ कर्मचाऱ्यांनी घेतले 'ईव्हीएम'चे धडे; निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने मार्गदर्शन
महाबळेश्वर , तारीख. २३ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या प्रक्रियेचा कणा असलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सज्जता पूर्ण झाली आहे. येथील शेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या सभागृहात आज पार पडलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात ५०९ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्यपद्धती आणि 'ईव्हीएम' हाताळणीचे सखोल ज्ञान आत्मसात केले. या सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांना लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी 'टीम वर्क'चा मंत्र दिला.
सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या चार तासांच्या प्रशिक्षण सत्रात १२६ केंद्राध्यक्ष आणि ३८३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग होता. प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण 'ईव्हीएम हँड्स ऑन' सराव ठरले. मतदान केंद्र सज्ज करण्यापासून ते मतदानाची गोपनीयत राखण्यापर्यंतच्या तांत्रिक बाबींचे सादरीकरण श्रीमती वैशाली राजमाने यांनी केले. केवळ नियम न सांगता, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावर काढायचे तोडगे त्यांनी समर्पक उदाहरणांसह मांडले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
मतदान प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी चिन्हांकित मतदार यादीचे वाचन आणि त्यातील तांत्रिक बारकावे समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर या सत्रात विशेष भर देण्यात आला. श्री. सचिन म्हस्के यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांमधील सुसंवाद हाच यशस्वी मतदानाचा आधार असल्याचे सांगत संघभावनेने काम करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रशासनाच्या या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे आता महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज झाली असून, पारदर्शक निवडणुकांसाठी हे सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
Jaoli, Satara | Jul 30, 2026