श्रीवर्धन: यंदा ७६ दिवस मासेमारी बंदी
राज्यातील सागरी मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांचा प्रजनन काळ आणि मच्छीमारांची सुरक्षा लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत १५ दिवसांची मोठी वाढ केली आहे. दरवर्षी ३१ जुलै रोजी संपणारी ही बंदी यंदा १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. यामुळे यंदाचा मासेमारी बंदी काळ ६१ दिवसांवरून थेट ७६ दिवसांचा होणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वी १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा बंदी काळ निश्चित करण्यात आला होता.