खडेगोलवली नव्हे, आता ‘खड्डेगोलवली’ करा!; कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप
कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी उपरोधिक मागणी केली आहे.
या मार्गालगत बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी बस चालकांना तब्बल अर्धा तास आधी निघावे लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Kalyan, Thane | Aug 7, 2026