गणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचा दूरदर्शी निर्णय; ठाणे आयुक्तालय व महामार्गावर विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांच्याकडून अधिसूचना जारी; अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात चोख अंमलबजावणी ; पुणे परिक्षेत्र महामार्ग अधीक्षक शिवाजी पवार आणि रायगड अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रात चोख नाकेबंदीचे नियोजन
ठाणे / मुंबई | संपादक मुज्जम्मील शेख
गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांची सुरक्षितता, विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आणि रस्त्यांवरील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने अत्यंत संवेदनशील आणि दूरदर्शी पाऊल उचलले आहे. ठाणे शहरासह मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर विसर्जनाच्या मुख्य दिवशी सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या अचूक आणि नियोजनबद्ध निर्णयाचे सर्वसामान्य नागरिक व भाविकांमधून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांची धडक अधिसूचना
ठाणे शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जात असल्याने येथे नेहमीच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. गणेशोत्सवात लाखो भाविक रस्त्यावर उतरत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत प्राप्त अधिकारांचा प्रभावी वापर करत ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात, यासाठी हा अत्यंत योग्य आणि खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune City, Pune | Sep 14, 2026