
नातवाच्या स्टंटबाजीचा आजोबांना फटका - वाहतुक शाखेने ठोठावला २३ हजार ५०० दंड
व्हायरल व्हिडीओतील स्कुटर वाहतुक पोलिसांनी केली जप्त!
कल्याण -कल्याण खडकपाडा परिसरात चार अल्पवयीन मुले स्कुटरवर भरधाव वेगात स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ स्थानिक न्यूज पोर्टल द्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कल्याण शहर वाहतूक उपशाखेने कारवाई सुरू केली. तपासाअंती माग काढत पोलीस श्रीराम राठोड यांच्यापर्यंत पोहचुन स्कुटर जप्त केली. ही स्कुटर त्यांचा १३ वर्षीय नातु चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, पोलिसांनी विविध मोटार वाहन कायद्यांअंतर्गत तब्बल २३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.वाहतूक पोलिसांनी वाहनाचा मालकी हक्क आणि विक्रीची साखळी तपासून अखेर स्कुटर सध्या वापरत असलेल्या श्रीराम राठोड यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचले. चौकशीत चित्रिकरणातील मुलांपैकी एक मुलगा हा राठोड यांचा १३ वर्षीय नातू असल्याचे समोर आले. नातवाने घरातील चावी नकळत घेऊन मित्रांसह स्कुटर बाहेर नेल्याची कबुली राठोड यांनी दिली. व्हिडीओतील प्रकार खरा असल्याचेही त्यांनी मान्य केले. यानंतर अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवणे, परवाना नसताना वाहन देणे, बेदरकार वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, ओव्हरलोडिंग आणि विमा नसणे अशा विविध उल्लंघनांबाबत एकूण २३ हजार ५०० रुपयांचे चलान न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच संबंधित स्कुटरही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या पथकाने केली.
स्टंटबाज स्कुटरच्या मालकांची रांग - तब्बल सहा मालक!
कल्याण खडकपाड्यातील स्टंटबाज स्कुटरच्या व्हायरल व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासात स्कुटरच्या मालकी हक्काचा भन्नाट प्रवास उलगडला. मूळ मालक आदित्य आखवे यांच्याकडून विविध डिलर्स आणि खरेदीदारांच्या माध्यमातून स्कुटर सारीका भिंगारदिवे, परविंदरकौर भामरा, जावेद खान असे तब्बल पाच मालक बदलून अखेर बेतुरकर पाड्यातील श्रीराम राठोड यांच्याकडे स्कुटर पोहोचल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, स्कुटरची आरटीओ नोंदणी अद्यापही हस्तांतरित न झाल्याने मालकीबाबत गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे व्हायरल चित्रिकरणातील अल्पवयीन चालक व इतर मुलांवर आणि स्कुटरचा ताबा असलेले श्रीराम राठोड यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
Kalyan, Thane | Jun 6, 2026