
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून नवा वाद; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा...
.
.
मुंबई: राज्यात सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता स्वतः रुपाली चाकणकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.या संपूर्ण वादावर अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्मात्यांना जाहीर इशारा दिला आहे. "जे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट (Sub-judice) आहे, त्यावर अशा प्रकारे चित्रपट बनवणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीची पूर्वपरवानगी न घेता तिचे पडद्यावर व्यक्तिचित्रण करणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे," असे चाकणकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्या संबंधित दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची एन्ट्री झाल्याने आधीच चर्चा रंगली होती. मात्र, आता थेट रुपाली चाकणकर यांनीच या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवत कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपट रिलीज होणार की वादाच्या भोवऱ्यात अडकणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
.
.
.
#MaharashtraEpsteinFiles #RupaliChakankar #DeepaliSayyed #AshokKharat #MarathiCinema #BreakingNews #MaharashtraPolitics #Controversy #LegalAction #MarathiMovie #TrendingNews
Haveli, Pune | Jul 2, 2026