
ठाण्यातील खून प्रकरणातील दोन आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद
ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोड क्रमांक २ येथील हनुमान मंदिराजवळ ५ जून रोजी दीपक भूषण जैस्वार (वय २३) यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे.
प्राथमिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अजय देवकीलाल गिरी (वय २८, उत्तर प्रदेश) आणि शिवा संजय गोस्वामी (वय २५, उत्तर प्रदेश) यांची ओळख पटवली. आरोपी रेल्वेमार्गे गोरखपूर एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतील भोसलें यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींचा गुप्तपणे पाठलाग करत कसारा रेल्वे स्थानक परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या १२ संशयित इसमांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत सपोनि पल्लवी ढगेपाटील, श्रेणीपोनि सुनील अहिरे, सपोनि राजेंद्र चौधरी, पोना तेजस ठोंबरे आणि पोका मिनिनाथ शिकारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पराग माने, तसेच पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाणे करीत आहे.
Kalyan, Thane | Jun 6, 2026