
लातूर :राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर पोवाड्याचे अनोखे सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड-किल्ल्यांची राखण करण्यासाठी मावळे सज्ज असायचे, तर आजच्या डिजिटल युगात आपल्या डिजिटल जगाची राखण करण्यासाठी सायबर योद्धे सज्ज आहेत, ही संकल्पना पोवाड्यातून मांडण्यात आली. पूर्वी शत्रूंकडून गड-किल्ल्यांना धोका निर्माण होत असे, तर आज सायबर गुन्हेगारांकडून मोबाईल, सोशल मीडिया खाती, वैयक्तिक माहिती आणि डिजिटल व्यवहारांना धोका निर्माण होऊ शकतो, हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
हा सायबर पोवाडा सायबर वॉरिअर अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, प्राची भोसले व गायत्री मायकर यांनी सादर केला. पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून आधुनिक सायबर सुरक्षेचा विषय विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने पोहोचविण्यात आला.
पोवाड्यातून ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपीची सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया सुरक्षा तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली.
“आजचे सायबर वॉरियर्स” ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडत डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. या अनोख्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#latur #cybersecurity #quickheal #LaturNews #iblisnews