
पर्यावरण दिनानिमित्त रेवती व गोवेली येथे वृक्षारोपण आणि जनजागृती रॅली
कल्याण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी मौजे रेवती येथील संरक्षित वन क्रमांक ४३ मधील वनक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वनपरिक्षेत्र अधिकारी, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विविध संस्था, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमास कल्याण ग्रामीण भाजप तालुकाध्यक्ष शेखर लोणे, नवगाव संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFM) चे अध्यक्ष व उपाध्यक्ष, वनविकास महामंडळ ठाणेचे वनपाल, वनरक्षक व कर्मचारी, दहागाव वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कुंदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच कारुण्य ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथील प्रा. भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. यानंतर रेवती व गोवेली गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. "कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव" तसेच "माकड म्हणतो हुप हुप, झाडे लावा खूप खूप" अशा घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुरलीधर गोविंद जागकर, वनपाल दहागाव यांनी उपस्थितांचे आभार मानले. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Kalyan, Thane | Jun 6, 2026