
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसीचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने बिरला महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, बिरला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रा, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमादरम्यान विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि शहराचा हरित विकास या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त अभिनव गोयल यांनी वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. केडीएमसीने यावर्षी सुमारे १.५० लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून नागरिक, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक आणि हरित शहर उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणारा आणि हरित भविष्यासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Kalyan, Thane | Jun 6, 2026