*१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद
1.2k views | Gondia, Maharashtra | Nov 1, 2026 *१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद. गोंदिया - राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. १ नोव्हेंबरला नांदेड येथून आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणारी ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्यसेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे. जनतेच्या सूचनांवरून आरोग्य सेवेत सुधारणा आरोग्य संवाद यात्रा ही केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम राहणार नसून, नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबत उत्तरदायित्व मजबूत करण्यावर भर राहणार आहे.