दुबईतून चालवत होता सायबर साम्राज्य; इंटरपोलच्या मदतीने मुख्य सूत्रधार गणेश काळे मुंबई विमानतळावर जेरबंद...
.
.
पिंपरी-चिंचवड:
आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट चालवणाऱ्या आणि शेकडो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अन्वेषण संस्था (Interpol) आणि लुकआऊट सर्कुलरच्या (LOC) मदतीने मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
देहूरोड येथील गुन्ह्यावरून लागला सुगावा:
देहूरोड पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी एक ऑनलाइन टास्क फ्रॉड (Online Task Fraud) संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना सायबर पोलिसांना एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचे धागेदोरे सापडले. या तपासातून गणेश काळे हाच या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.
दुबईत ऑफिस आणि चायनीज कनेक्शन:
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश काळे हा दुबईमध्ये स्वतःचे सुसज्ज कार्यालय थाटून राहत होता. तिथून तो थेट चीनमधील (China) सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होता. भारतातून हे नेटवर्क चालवण्यासाठी तो गरीब आणि गरजू लोकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती उघडायचा. त्यानंतर त्या खात्यांचे चेकबुक, एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड स्वतःकडे मागवून घ्यायचा. या खात्यांचा वापर करून तो फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम इतरत्र वळवत असे.
'डिजिटल अरेस्ट' आणि टास्क फ्रॉडचा सुळसुळाट:
गणेश काळे आणि त्याच्या टोळीने देशभरात 'ऑनलाइन टास्क फ्रॉड', 'शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे आमिष' आणि सध्या सर्वाधिक चर्चिक असलेल्या 'डिजिटल अरेस्ट'च्या माध्यमातून शेकडो निष्पाप नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच सप्टेंबर २०२५ मध्ये तो दुबईहून बँकॉकमध्ये पळून गेला होता. मात्र, सायबर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती. अखेर ११ जून रोजी तो बँकॉकहून भारतात परतत असताना मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी त्याला अडवून पिंपरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
.
.
.
#PimpriCyberPolice #CyberCrime #PimpriChinchwad #MumbaiAirport #Interpol #DigitalArrest #TaskFraud #CyberSafety #PuneCrime #BreakingNewsMarathi#PimpriChinchwadPolice #CyberCell #CyberCrimeIndia #DigitalArrest #OnlineFraud #Interpol #MumbaiAirport #CrimeNewsPune #DehuRoad #MarathiNews #DigitalMediaMarathi
Haveli, Pune | Jun 13, 2026