शिवसेना ठाकरे गटाच्या सहा फुटलेल्या खासदारांना Y+ सुरक्षा प्रधान
'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; खासदार ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांना Y+ सुरक्षा
प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असून त्यांनाही ही सुरक्षा तत्काळ लागू करण्यात आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांतराच्या चर्चांना आलेले वेग आणि काही लोकप्रतिनिधींना असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Y+ सुरक्षा श्रेणीमध्ये संबंधित व्यक्तीला 24 तास सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलन अहवालानुसार सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप निश्चित केले जाते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी आघाडीत जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत सहा खासदारांना एकाचवेळी Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, सुरक्षा प्रदान करण्यामागील नेमके कारण आणि संबंधित गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या निर्णयाकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
#OperationTiger #OmrajeNimbalkar #YPlusSecurity #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #Dharashiv #PoliticalNews #MaharashtraNews #BreakingNews #veermaharashtranews