येडशीतील भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घटनास्थळी दिली भेट
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. येथील करंडे गिफ्ट सेंटर व करंडे किराणा दुकानाला मध्यरात्री सुमारे २ ते २:३० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या आगीत दुकानासह वरील घरही जळून खाक झाले. या घटनेमुळे येडशी परिसरावर शोककळा पसरली आहे.
या घरातील सात जणांपैकी केवळ २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला. विशेष म्हणजे, आगीतून मुलाचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनी स्वतःचे प्राण गमावल्याची घटना अत्यंत वेदनादायी ठरली आहे. मुलाच्या रक्षणासाठी एका पित्याने केलेला अखेरचा संघर्ष मन हेलावून टाकणारा असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
या आगीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने तातडीने आवश्यक आर्थिक मदत देण्यात यावी. याशिवाय उर्वरित कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.
या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सहा जणांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
Dharashiv, Dharavshiv | Nov 9, 2026