
वंचित बहुजन आघाडीने साजरी केली ‘काळी दिवाळी’; चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध
(दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन)
धाराशिव (दि. ८ नोव्हेंबर) : राज्यातील अनियमित पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, शेतमजुरांच्या हाताला काम नसणे आणि ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेची आर्थिक ओढाताण या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पीक आले नाही. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे.
दुष्काळ हे केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित संकट नसून त्याचे परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. भूमिहीन नागरिक, शेतमजूर, रोजंदारी कामगार, परित्यक्ता महिला, पशुपालक, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि बेरोजगार युवक यांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आखताना केवळ जमीनधारक शेतकऱ्यांचा विचार न करता सर्व बाधित घटकांचा समावेश करावा. प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र मदत व पुनर्वसन योजना जाहीर करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dharashiv, Dharavshiv | Nov 10, 2026