
पोलीस ठाण्यासमोरील ATM मध्येच ज्येष्ठ नागरिकाला गंडा
30 हजार लंपास; दोन महिलांविरुद्ध गुन्हा
उदगीर : प्रतिनिधी
दि. 07 ऑगस्ट 2026
पोलीस ठाण्याच्या सुरक्षेत असलेल्या ATM मध्येही आता नागरिक सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना गुरुवारी उदगीरमध्ये घडली. उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या समोरील एसबीआय बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून दोन महिलांनी 30 हजार रुपये लंपास केले.
गप्पा मारून पिशवी साफ
शहरातील ज्ञानेश्वर किशनराव ढगे हे दि. 07 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या सुमारास पैसे काढण्यासाठी ATM मध्ये गेले होते. पैसे काढून मोजत असतानाच आत आलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. "काका किती काढले?", "बॅलन्स बघा" असे प्रश्न विचारून त्यांचे लक्ष विचलित केले. याचाच फायदा घेत एकीने ढगे यांच्या हातातील पिशवीतून 30 हजारांची रोख रक्कम काढली आणि दोघीही निघून गेल्या.
फसवणूक लक्षात येताच ढगे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गु.र.नं. 346/2026, BNS कलम 303(2), 3(5) नुसार दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
CCTV च्या आधारे तपास
घटनास्थळी भेट दिलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्री. उस्तुर्गे यांनी ATM आणि आजूबाजूच्या दुकानांचे CCTV फुटेज ताब्यात घेतले आहेत. पोलीस निरीक्षक श्री. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.
सुरक्षेवर प्रश्न
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ATM मध्ये अशा घटना घडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही लातूर जिल्ह्यात ATM मधील फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पोलिसांचा सल्ला
ATM मध्ये व्यवहार करताना दरवाजा बंद ठेवावा, कोणाशीही बोलू नये आणि पिशवी समोर ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधावा.
Latur, Latur | Aug 8, 2026