
१२ वर्षीय पीडितेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; API एस.जी. द्रोणाचार्य व हवालदार गणेश मालवदे यांच्या तपासाची ठोस फलश्रुती
लातूर । नागझरी परिसरात घडलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात आरोपी पवन बाळासाहेब हरबडे (रा. लातूर) याने पीडितेला लातूर शहर फिरवून आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून पुणे येथे नेले होते. आरोपी नंतर बहिणीच्या घरी कोणीही नसताना तिच्यावर अत्याचार केला होता.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी २ फेब्रुवारी २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजि. क्र. ७४/२०२५ अन्वये पोक्सो कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. द्रोणाचार्य यांनी हाताळला, तर तपास मदतनीस म्हणून पोलीस हवालदार *गणेश मालवदे* यांनी काम पाहिले. त्यांनी जमा केलेले भक्कम पुरावे, साक्षीदार, वैद्यकीय बाबी आणि घटनाक्रम याची न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारी साखळी उभी केली.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता एम. एस. महिंद्रकर यांनी बाजू मांडली.
पुराव्यांचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी पवन हरबडे यास दोषी ठरवले. न्यायालयाने पोक्सो कायदा कलम ४ आणि भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) अन्वये २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
तपास अधिकाऱ्यांचा सन्मान: API द्रोणाचार्य यांची बदली सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे झाली असून ते लातूरमध्ये कार्यरत नाहीत, मात्र त्यांनी लातूरमध्ये केलेल्या या तपासाची कहाणी न्यायालयीन निकालानंतर अधोरेखित झाली आहे.
पीडितेच्या कुटुंबासाठी हा निकाल न्यायाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
Latur, Latur | Oct 3, 2026