
अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा, AHTU ची कारवाई
लातूर : लातूर शहरातील होळकर नगर परिसरात भाड्याच्या घरात महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
होळकर नगर, अंबाजोगाई रोड येथे प्रियंका बाळासाहेब केंद्रे वय 33 हिने भाड्याच्या घरात महिलांना बोलावून पुरुष ग्राहकांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासाठी गोविंद हनुमान केंद्रे वय 26 हा दलाल म्हणून काम करीत होता. दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 17 वर्षे 9 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून 2000 रुपये रोख, मोबाईल फोन असा एकूण 7000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 678/2026 अन्वये BNS कलम 143, 144, 3(5), पोक्सो अधिनियम कलम 16, 17, 18, बाल न्याय अधिनियम कलम 78 आणि PITA अधिनियम कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक डॉ. भगीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील, सदानंद योगी, सुधामती वंगे, लता गिरी, सचिन मुंडे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चवरे, एमआयडीसी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
Latur, Latur | Oct 1, 2026