
‘व्यसनमुक्त भारत’ जनजागृतीसह विद्यार्थिनींना कराटे–मार्शल आर्टचे प्रशिक्षण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम; कल्याण व डोंबिवलीतील ६०० विद्यार्थिनींना प्रशिक्षण
कल्याण : समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी तरुण पिढीमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासोबतच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
महापालिकेच्या ‘सेवा संकल्प’ अभियानाअंतर्गत ‘व्यसनमुक्त भारत’ जनजागृती अभियान तसेच विद्यार्थिनींसाठी कराटे–मार्शल आर्ट स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत सुभेदारवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींसाठी कराटे आणि मार्शल आर्टच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता यावे, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण व्हावे तसेच त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, अश्लील वर्तन तसेच विविध प्रकारच्या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हा उपक्रम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सभापती सारिका जाधव, महिला व बालकल्याण विभागाच्या उपआयुक्त कांचन गायकवाड, महापालिका शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहायक आयुक्त ढवळू चौरे, सुभेदारवाडा शाळेचे मुख्याध्यापक सागर धामोडे, शाळेचे संचालक, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, कराटे प्रशिक्षकांची टीम आणि समुपदेशक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम एक महिना सुरू राहणार असून कल्याण आणि डोंबिवली विभागातील प्रत्येकी ३०० विद्यार्थिनींना, म्हणजेच एकूण ६०० विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
व्यसनमुक्तीबाबत जनजागृती आणि मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण या दोन्ही बाबींचा समन्वय साधणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Kalyan, Thane | Oct 2, 2026