
दादा रागीट नाहीत, तर फणसासारखे… वरून काटेरी, आतून गोड गऱ्यासारखे!
जवळ गेल्यावरच माणसाचा खरा स्वभाव कळतो;
१४ वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभवातून उलगडले आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे व्यक्तिमत्त्व
माजलगाव | विशेष लेख
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या स्वभावाविषयी अनेकदा कानावर येत होते की, दादा खूप रागीट आहेत, कधी कधी वसकन बोलतात. मात्र, माणसाच्या स्वभावाविषयी ऐकलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष अनुभव यात किती मोठा फरक असतो, याची जाणीव मला अनेकदा झाली. कारण जवळ गेल्यावरच माणसाचा खरा स्वभाव, त्याचे गुण आणि त्याच्या मनातील जनहिताची तळमळ समजते.
दादांच्या स्वभावाचे वर्णन करायचे झाले, तर ते फणसासारखे आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. फणसाच्या बाहेर काटे असले, तरी आतमध्ये गोड, रसाळ गरा असतो. त्याचप्रमाणे दादांच्या व्यक्तिमत्त्वाकडे केवळ बाहेरून पाहून मत बनवण्यापेक्षा त्यांच्या जवळ जाऊन अनुभव घेतला, तर त्यांच्या स्वभावातील समजूतदारपणा, सहजता आणि माणुसकीची जाणीव होते.
मी पत्रकार म्हणून अनेक वर्षांपासून विविध विषयांवर आमदार प्रकाशदादा सोळंके यांची मुलाखत, प्रतिक्रिया अर्थात बाईट घेण्यासाठी जात असतो. कदाचित दादांना माझी वैयक्तिक ओळख नसेलही; मात्र पत्रकार म्हणून मी त्यांच्याकडे अनेकदा गेलो आहे. प्रत्येक वेळी दादा कितीही कामात असले, तरी ‘बोला, तुमचे काय काम आहे?’ असा सहज प्रश्न विचारतात.
मी त्यांना एखाद्या विषयावर प्रतिक्रिया हवी असल्याचे सांगितले की, दादा कोणताही आढेवेढे न घेता कॅमेऱ्यासमोर येतात आणि त्या विषयावरील आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात.
विशेष म्हणजे, पत्रकाराने प्रश्न विचारताना त्यांच्या कामाविषयी नकारात्मक बाजू मांडली, एखाद्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला, तरी त्यांनी कधीही ‘तुम्ही माझ्या कामाविषयी निगेटिव्ह प्रश्न का विचारता?’ असे म्हटल्याचे मला आठवत नाही. उलट, प्रश्न समजून घेऊन त्यावर दिलखुलासपणे आपले मत मांडण्याची त्यांची पद्धत मला नेहमीच भावली.
१४ वर्षांच्या अनुभवात दादांचा राग पाहिला नाही!
म्हणतात ना, माणसाची खरी ओळख त्याच्या जवळ गेल्यावरच होते. माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात दादांच्या स्वभावाचे अनेक पैलू अनुभवायला मिळाले. आजवरच्या १४ वर्षांच्या अनुभवात दादा माझ्यावर रागावल्याचे मला आठवत नाही.
एक प्रसंग तर विशेष लक्षात राहण्यासारखा आहे.
दादांची एका महत्त्वाच्या विषयावर बैठक सुरू होती. जवळपास दोन तास बैठक चालली होती. बैठक संपल्यानंतर दादा बाहेर पडत होते. त्यांना भूकही खूप लागली होती. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला थोडा वेळ विश्रांती घ्यावीशी वाटेल, जेवण करावेसे वाटेल.
मात्र, त्याच वेळी मला दादांची बाईट हवी होती.
मनात विचार आला की, आता दादा थोडे चिडतील. दोन तास बैठक झालेली, भूक लागलेली आणि त्यात पुन्हा पत्रकाराचा प्रश्न! पण दादांनी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता माझ्याशी संवाद साधला. माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि कॅमेऱ्यासमोर आपली भूमिका मांडली.
त्या क्षणी मला जाणवले की, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची तयारी किती महत्त्वाची आहे.
जनता दरबारातील गर्दी केवळ गर्दी नसते!
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या निवासस्थानी अनेकदा जनता दरबार भरताना पाहायला मिळतो. विविध गावांतील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि सामान्य माणसे आपल्या समस्या घेऊन दादांकडे येतात.
हा जनता दरबार पाहताना मनात एक प्रश्न निर्माण होतो, की एवढ्या मोठ्या संख्येने लोक येथे का येत असतील?
मात्र, प्रत्यक्ष अनुभवातून त्याचे उत्तर मिळते.
लोकांना आपल्या प्रश्नांची दखल घेतली जाते, आपले म्हणणे ऐकून घेतले जाते आणि कामाचा निपटारा होण्याची अपेक्षा असते. त्यामुळेच दादांच्या निवासस्थानी नागरिकांची गर्दी दिसते.
लोकप्रतिनिधीच्या यशाचे खरे मोजमाप केवळ निवडणुकीतील विजयाने होत नाही, तर सामान्य माणूस त्याच्याकडे किती विश्वासाने जातो, यावरही होते. या दृष्टिकोनातून पाहिले, तर माजलगाव मतदारसंघातील नागरिकांचा दादांवरील विश्वास त्यांच्या जनता दरबारातून दिसून येतो.
उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी आणि लोकशाहीचा संवाद
माजलगाव मतदारसंघाला उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी मिळाला आहे, ही येथील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.
शिक्षणामुळे विचारांची स्पष्टता, प्रश्न समजून घेण्याची क्षमता आणि निर्णय प्रक्रियेतील समज वाढते.
लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होतो.
दादांच्या बाबतीत मला जाणवलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी.
लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ स्तुती करणारी नसून, प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या समस्या मांडणारी असते.
पत्रकाराने प्रश्न विचारणे आणि लोकप्रतिनिधीने त्यावर आपली भूमिका स्पष्ट करणे, हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.
या संवादातून लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यात विश्वास निर्माण होतो.
मतभेद असले, तरी संवाद कायम राहणे ही लोकशाहीची सुंदर परंपरा आहे.
दादांच्या यशामागे जनतेशी असलेले नाते!
राजकारणात यशस्वी होण्यासाठी केवळ राजकीय गणिते पुरेशी नसतात. जनतेशी असलेले नाते, लोकांच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता, संवादाची तयारी आणि सामान्य माणसाला दिले जाणारे महत्त्व या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या स्वभावातील हे पैलू मला पत्रकारितेच्या अनुभवातून जाणवले आहेत.
एखाद्या व्यक्तीविषयी ऐकलेल्या गोष्टींवरून तिचे व्यक्तिमत्त्व ठरवणे सोपे असते; परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मत बदलण्याची तयारी ठेवणे, हीच खरी समजूतदारपणा आहे.
माझ्यासाठी दादा म्हणजे केवळ एक आमदार नाहीत, तर पत्रकाराच्या प्रश्नांना वेळ देणारा,
संवाद साधणारा आणि जनहिताच्या विषयांवर आपली भूमिका मांडणारा लोकप्रतिनिधी आहे.
फणसाच्या बाहेर काटे असले, तरी आतला गरा गोड असतो. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्वाच्या बाह्य आवरणापलीकडे जाऊन माणसातील चांगुलपणा पाहिला, तर अनेक गैरसमज दूर होतात.
शेवटी एवढेच…
माणूस किती मोठा आहे, हे त्याच्या पदावरून नव्हे, तर सामान्य माणसाला तो किती सहजपणे भेटतो, त्याचे म्हणणे किती संयमाने ऐकतो आणि त्याच्या प्रश्नांना किती गांभीर्याने घेतो, यावरून ठरते.
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याविषयीचा माझा १४ वर्षांचा पत्रकारितेतील अनुभव मला हेच सांगतो.
दादा रागीट नाहीत, तर फणसासारखे आहेत… वरून काटेरी, पण आतून गोड गऱ्यासारखे!
— पत्रकार सुहास बोराडे PN TV MARATHI NEWS