
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा
मुंबई, दि. २० ऑक्टोबर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा दिला आहे. शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संघटनेने डॉ.पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्राद्वारे संघटनेची भूमिका स्पष्ट केली आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हाध्यक्ष प्रचारकार्यात सक्रिय सहभाग घेऊन काम करतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी शिक्षक भारतीचे सुभाष मेहर यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन डॉ.पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिक्षक बंधू-भगिनींसह सर्व पदवीधर मतदारांनी शिक्षक भारतीने पाठिंबा दिलेल्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संघटनेच्या या भूमिकेमुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या वातावरणात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला विजयाचा निर्धार आणि प्रचारासाठी दिलेल्या सूचना यामुळे डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीत शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कशा प्रकारे प्रचारात सहभागी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Dharashiv, Dharavshiv | Oct 20, 2026