
प्रभाग क्रमांक २० मध्ये विलास बापू लोंढे यांच्यातर्फे भव्य दिवाळी फराळ वाटप; नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते शुभारंभ
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला विलास बापू लोंढे यांचा प्रतिसाद
धाराशिव : दिवाळीचा आनंद सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने भाजपा नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २० सह इतर प्रभागांतील नागरिकांसाठी भव्य दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात फराळ वाटपाचे नियोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हारतुरे किंवा बॅनरबाजीवर खर्च न करता त्याऐवजी गोरगरीब, गरजू आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात द्यावा. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक विलास बापू लोंढे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबविला. मात्र, यंदा केवळ प्रभाग क्रमांक २० पुरते मर्यादित न राहता इतर प्रभागांतील नागरिकांनाही या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट प्रमाणात फराळ वाटपाचे नियोजन केले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नगराध्यक्षा नेहा ताई काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विलास (बापू) लोंढे आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती ताई लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रभागातील तसेच इतर भागांतील मोठ्या संख्येने महिला, माता-भगिनी आणि नागरिक उपस्थित होते. फराळ वाटपावेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
विलास बापू लोंढे हे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागातील विविध प्रश्नांवर काम केले. त्यानंतर पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कामाचा व्याप आणि जबाबदारी वाढली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या आवाहनाचा सामाजिक उपक्रमातून प्रतिसाद देत, दिवाळीचा आनंद अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विलास बापू लोंढे यांनी केला. त्यामुळे यंदाचे फराळ वाटप विशेष चर्चेचा विषय ठरले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी , नगरसेवक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
#OsmanabadNews #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #अंतरसंवादन्यूज #धाराशिव #विलासलोंढे #राणाजगजितसिंहपाटील #नेहाकाकडे #दिवाळीफराळ #सामाजिकउपक्रम #DharashivNews #DiwaliCelebration
Dharashiv, Dharavshiv | Nov 9, 2026