
शैक्षणिक विकासासाठी लॉयन्स क्लब व उदयगिरी लॉयन्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद : माजी मंत्री आ. संजय बनसोडे
उदगीर(प्राईम लाईव्ह न्युज नेटवर्क) दि. ३ लॉयन्स क्लब, उदगीर व उदयगिरी लॉयन्स असोसिएशन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले लॉयन्स स्टडी सेंटर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण, आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने लॉयन्स क्लबने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर शहरात लॉयन्स क्लब, उदगीर व उदयगिरी लॉयन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयन्स स्टडी सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. संजय बनसोडे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटिया, जिल्हा परिषद सभापती ज्ञानेश्वर बिरादार, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जॉनी मिया, शशिकांत बनसोडे, नगरसेवक शिवकुमार कांबळे, वर्षा कांबळे, प्रकाश बिरादार, गुरुनाथ बिरादार, ॲड. गुलाबराव पटवारी, प्रा. महेश बसपुरे, डॉ. भाग्यश्री घाळे, मुरलीधर जाधव, व्यंकट मोरे, दीपक बलसुरकर, कोमल मुंदडा, तृप्ती मुंदडा, धनश्री अदेप्पा, भाग्यश्री पोतदार, प्रेरणा जैन, ला. विवेक जैन, ला. प्रवीण मुंदडा, प्रा. अनंत दापकेकर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, "शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि जिद्द आहे. मात्र, अनेकदा योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी त्यांच्या स्वप्नांना अपेक्षित दिशा मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देणारे लॉयन्स स्टडी सेंटर त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची भूमिका बजावेल."
"स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची शिस्त, सातत्य आणि योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेऊन आपले ध्येय निश्चित करावे आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे," असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, सामाजिक संस्थांनी शिक्षण, आरोग्य आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी असेच विधायक उपक्रम राबवावेत. लॉयन्स क्लब आणि उदयगिरी लॉयन्स असोसिएशनने हाती घेतलेला हा उपक्रम उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
Latur, Latur | Oct 3, 2026