खंडापूर सप्ताह देणगी अपहार प्रकरण; कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
लातूर तालुक्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील कथित ३.६५ कोटी रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणीकर हा लातूर शहरातील मोतीनगर परिसरातील आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यापूर्वी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात किशोर जाधव शिवणीकर, त्याचा सहकारी सोनवणे आणि इतर काही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खंडापूर येथील धार्मिक उत्सवासाठी जमा झालेल्या देणगीपैकी सुमारे ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या कथित अपहाराचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
Latur, Latur | Jul 10, 2026