नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू; पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन
पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत, पिंपरी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह पोलीस सेवा देणे हेच आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे पोलिसांचे काम अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वागत व सत्काराच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार कलिंदर मामू शेख, राजन नायर, युवा नेते कासिम बागवान, इरशाद चाऊस, आसिफ पठाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Pune City, Pune | Jul 31, 2026