साडेचार किलो गांजासह तस्कर जेरबंद ; शिवाजीनगर पोलिसांचा सापळा यशस्वी...
.
.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. रेल्वे रुळांजवळील भैय्यावाडी परिसरात पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात साडेचार किलो गांजासह एका तस्कराला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सदाशिव कांबळे (वय २८, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्तीवर असताना त्यांना एका खबरीकडून या तस्कराबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने भैय्यावाडी परिसरात सापळा रचला आणि राहुल कांबळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साडेचार किलो गांजा आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी राहुल हा हैदर शफान इराणी नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा गांजा विक्री करण्यासाठी पुण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हैदर इराणी याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
.
.
.
#Pune #Shivajinagar #PunePolice #DrugBust #GanjaSmuggling #CrimeNews #PuneCrime #BreakingNews #NDPSAct #ActionAgainstDrugs
Haveli, Pune | Jun 11, 2026