प्रसार माध्यमांद्वारे आता होणार आरोग्यबाबत जनजागृती
1k views | Beed, Maharashtra | Sep 6, 2026 आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आढावा बैठक #पुणे, दि. ५ सप्टेंबर : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कामकाजाचा तसेच माध्यम व जनसंपर्क यंत्रणेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील NCCRC येथे शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीस डॉ. विजय कंदेवाड, संचालक (प्राथमिक), पुणे, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, पुणे येथील ब्युरो प्रमुख तसेच जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी उपस्थित होते. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. 🔵 माध्यमांशी समन्वय वाढवून योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा बैठकीच्या दुसऱ्या सत्रात माध्यम व सोशल मीडिया कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध आरोग्य सेवांची अधिकृत व वस्तुनिष्ठ माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा, असे निर्देश श्री. काटकर यांनी दिले. राज्यातील तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रिंट, डिजिटल, सॅटेलाइट न्यूज चॅनेल आणि सोशल मीडिया माध्यमांचे नियमित निरीक्षण करावे. आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या, वृत्त, व्हिडिओ, पोस्ट तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया व संदेश यांची तात्काळ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.