रंगकर्मीची कीर्तावणी : अभंग-भारूडातून संतविचार, उदगीरकर मंत्रमुग्ध
उदगीर (प्रतिनिधी) - संतसाहित्य, वारकरी परंपरा आणि आधुनिक जीवनातील वास्तव यांचा सुरेख संगम साधत रंगकर्मी प्रतिष्ठान, उदगीरच्यावतीने छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात 'कीर्तावणी' या संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अभंग, भारूड, लावणी, कीर्तन आणि बतावणीच्या माध्यमातून संतविचारांचा जागर घडविणाऱ्या या प्रयोगाने उदगीरकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेली वैचारिक व सांस्कृतिक देणगी आणि संतविचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आली. उपरोधिक, खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर विवेकजागृतीचा संदेशही रसिकांपर्यंत पोहोचला. ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे या कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला संगीत, नृत्य व वादनाची उत्तम साथ लाभल्याने संपूर्ण प्रयोगातून जणू पंढरीच्या वारीचाच अनुभव रसिकांना मिळाला.
या प्रयोगास माजी मंत्री आ. संजय बनसोडे, बसवराज पाटील नागराळकर, तहसीलदार राम बोरगावकर, रमेश अण्णा अंबरखाने, रामभाऊ तिरुके, जिल्हा परिषद बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, शिक्षक नेते सर्जेराव भांगे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप मटके, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल भिकाने, उपसभापती विक्की भोसले, बालाजी भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसुल पठाण यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. महेश मळगे यांनी केले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रसूल पठाण, रामदास केदार, अॅड. महेश मळगे, नीता मोरे, लक्ष्मण बेंबडे, संदीप निडवदे, मनोहर लोहारे, हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, मारोती भोसले, प्रल्हाद येवरीकर, बाबासाहेब मादळे, विशाल आदेप्पा यांनी परिश्रम घेतले.
Latur, Latur | Oct 15, 2026