अपोलो हॉस्पिटल्सची ‘ऑलवेज ओपन, ऑलवेज हेअर’ आरोग्यसेवेत नवी सुरुवात
रविवारीही कन्सल्टेशन, डायग्नोस्टिक्स व हेल्थ चेकअपची सुविधा; रुग्णांना वेळेची अडचण राहणार नाही
मुंबई, दि. १९ : आठवड्याच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा अपोलो हॉस्पिटल्सने केली आहे. रुग्णालयाने ‘ऑलवेज ओपन, ऑलवेज हेअर’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली असून, आता रविवारसह आठवड्याचे सातही दिवस नियमित आणि नियोजित आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्समध्ये आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील दाखल रुग्णांसाठीच्या सेवा यापूर्वीपासूनच २४ तास उपलब्ध आहेत. मात्र, या नव्या उपक्रमामुळे बाह्यरुग्ण तज्ज्ञांचा सल्ला, डायग्नोस्टिक चाचण्या, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, फॉलो-अप कन्सल्टेशन तसेच पूर्वनियोजित वैद्यकीय प्रक्रिया रविवारीही उपलब्ध होणार आहेत.
कामकाजाच्या दिवसांमध्ये वेळ मिळत नसल्याने अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी किंवा आवश्यक चाचण्या पुढे ढकलतात. परिणामी आजाराचे निदान उशिरा होण्याचा धोका वाढतो. अपोलोच्या ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२६’ अहवालानुसार, देशात उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर मेटाबॉलिक विकारांचे प्रमाण वाढत आहे. अपोलोच्या आरोग्य तपासणीमध्ये २६ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब, तर २३ टक्के व्यक्तींमध्ये मधुमेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नसतानाही हे विकार आढळले आहेत.
त्यामुळे केवळ लक्षणे दिसल्यानंतर उपचार घेण्याऐवजी वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. रविवारची सुविधा उपलब्ध झाल्याने नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांना त्यांच्या सोयीच्या दिवशी आरोग्य तपासणी करून घेणे शक्य होणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना, आरोग्यसेवेचा उद्देश केवळ आजारावर उपचार करणे नसून आजाराची वेळेपूर्वी ओळख करून त्याला प्रतिबंध करणे हा असल्याचे सांगितले. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सल्ला मिळाल्यास आजार गंभीर होण्यापूर्वी त्यावर योग्य उपचार करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.
read more comment......
Pune City, Pune | Aug 23, 2026