सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या, २१ गुन्हे उघडकीस; सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.किल्लारी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत वीजतार चोरट्यांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या वीजतारा तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यातील २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
दि. १२ जुलै २०२६ रोजी किल्लारी गावात एक संशयित इसम वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव
१)आकाश गोपाळ देंडे (वय ३१, रा. किल्लारीवाडी, ता. औसा, जि. लातूर)
असे सांगितले. अधिक चौकशीमध्ये त्याने किल्लारी परिसरात महावितरणच्या विद्युत खांबावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातील साथीदारांची माहितीही पोलिसांना दिली.
त्याच्या कबुलीजबाबावरून
२) अविनाश अजाप्पा कोमारे (वय २५, रा. शिवनगर, ता. निलंगा, जि. लातूर)
याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख ४८ हजार रुपयांच्या चोरीच्या विद्युत तारा, चोरीसाठी वापरलेली एक मोटारसायकल (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) आणि एक मालवाहू छोटा हत्ती (अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये) असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. २५/२०२६, ७०/२०२६, ८९/२०२६, १०४/२०२६, १४३/२०२६, २४१/२०२६, २४२/२०२६, २४३/२०२६, २४४/२०२६ व २४५/२०२६ (कलम १३६, वीज अधिनियम) या गुन्ह्यांची तसेच ११ अदखलपात्र मालमत्ता विषयक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशन मरडे, सहाय्यक फौजदार गणेश यादव, पोलीस अमलदार महेश पवार, शिवप्रसाद करके, कृष्णा गायकवाड, नितीन चव्हाण, शिरसमकर, आकाश सरतापे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, रसूल पठाण आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Latur, Latur | Jul 14, 2026