
उदगीर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; थारसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
उदगीर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बिदर गेट परिसरात नाकाबंदी दरम्यान थार गाडीसह 14 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस गस्तीवर असताना गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ठाकरे चौक, बिदर गेट येथे बिदरहून येणारी एक थार गाडी (MH 24 BR 7722) संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता आतमध्ये पोत्यांमध्ये भरून ठेवलेला प्रतिबंधित पान मसाला आढळला.
पोलीस तपासात गाडीमध्ये विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखू, राज निवास सुगंधित पान मसाला आणि जाफरानी जर्दा असा एकूण 2 हजार 138 पुड्यांचा साठा मिळाला. या गुटख्याची किंमत 2 लाख 48 हजार 538 रुपये आहे. गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरलेली 12 लाख रुपये किमतीची थार गाडी असा एकूण 14 लाख 48 हजार 538 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी शेख असलम शेख गौस (वय 35) याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 728/2026 दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर BNS कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा आणि मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि नरवटे हे करत आहेत.
Latur, Latur | Oct 17, 2026