
उसाच्या शेतात गांजाची लागवड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल
लातूर, दि. 19 : उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर अनंतपाळ तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून 8 किलो 620 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत 4 लाख 31 हजार रुपये आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सांगवी-घुगी शिवारातील सर्व्हे क्रमांक 12 मधील मधुकर बिरादार यांच्या उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी शेतातून गांजाची झाडे उपटून दोन पोत्यांमध्ये भरलेला एकूण 8.620 किलो गांजा मिळून आला.
याप्रकरणी मनोज मधुकर बिरादार (वय 38, रा. सांगवी-घुगी, ता. शिरूर अनंतपाळ) याच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 333/2026, कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) एनडीपीएस अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची फिर्याद परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
Latur, Latur | Oct 19, 2026