
दुष्काळात शेतकऱ्यांना आणि गरजूंना साथ हाच युवकांचा संकल्प; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा लातूरमध्ये उत्साहात संपन्न
लातूर :जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवक संकल्प मेळावा लातूर येथे मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या मेळाव्यात प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील 101 गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
काल दि. 13/10/2026 रोजी सेलेब्रेशन रिसॉर्ट, लातूर येथे हा भव्य मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष निखील दादा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, जि. प. सदस्य डॉ. दीपक सोमवंशी, जि. प. सदस्य उमेश उमापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अंकुश नाडे, कार्यालयीन युवक प्रदेश सरचिटणीस अमरजी पाटील व इतर सर्व सन्माननीय जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी फोन कॉलद्वारे उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
कार्यक्रमाचे आयोजक युवक जिल्हाध्यक्ष महेश बिरादार यांनी युवक संघटनेच्या कार्याचा संपूर्ण आढावा सादर करत युवकांच्या विविध मागण्या मांडल्या व जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याची विनंती केली. त्यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील युवक संघटना अतिशय चांगले आणि भरीव काम करत असून त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन युवक प्रदेशाध्यक्ष निखील ठाकरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा व तालुका स्तरावरील विविध नियुक्त्यादेखील देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष रवी धुमाळ व कार्यकारिणीने परिश्रम घेतले, सूत्रसंचालन जिल्हा संघटक जनक बिरादार यांनी केले व आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद बाजगिरे यांनी मानले.
Latur, Latur | Oct 14, 2026