
उदगीर ग्रामीण पोलिसांची अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे जेरबंद
उदगीर, दि. 15 - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून बिदर गेट - ठाकरे चौक परिसरात मध्यरात्री करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 21.30 वाजेच्या सुमारास बिदर गेट परिसरातून एक संशयास्पद कार जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाणे प्रभारी पोनि. गाडे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पोहेका 462 श्रीमंगले यांच्या पथकाने सापळा रचून MH 21 BF 9390 क्रमांकाची मारुती सुझुकी डिझायर कार अडवली. कारची झडती घेतली असता, आतमध्ये पोत्यांमध्ये दडवून ठेवलेला प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी कारसह दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 87 हजार 950 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू तसेच गुन्ह्यात वापरलेली 8 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 9,87,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मंचक रघुनाथ मोटे वय 31 वर्षे आणि मोतीराम मुंजाजी गायकवाड वय 39 वर्षे दोघेही रा. आपोली ता. गंगाखेड जि. परभणी येथील आहेत.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी बजरंग नागनाथ गजलवार वय 33 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 719/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3(5) आणि अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरीक्षक नरवटे हे करीत असून हा माल कुठून आणला, उदगीरमध्ये कोणाला पुरवठा करणार होते आणि यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास हानिकारक असल्याने गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही परराज्यातून आणि इतर जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने हा माल आणून विक्री केली जाते.
पोलीस निरीक्षक गाडे यांनी सांगितले की, अवैध धंदे आणि प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीवर रोख लावण्यासाठी आमचे पथक सतत गस्त घालत आहे.
Latur, Latur | Oct 20, 2026