
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
वाचनामुळे अलौकिक आनंद मिळतो - प्र. प्राचार्य डॉ. एन.जी. एमेकर
उदगीर (प्रतिनिधी) - येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन.जी. एमेकर होते, तर मंचावर ग्रंथपाल प्रा. अजित रंगदळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनराज बंडे यांनी केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एमेकर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी तास संपल्यानंतर ग्रंथालयात बसायला हवे. ग्रंथालयात आल्यानंतर काही ना काही शिकायला मिळते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि किरण बेदी यांसारख्या व्यक्तींनी वाचन संस्कृतीतूनच इतिहास निर्माण केला. त्यामुळे वाचन संस्कृतीपासून दूर जाता कामा नये, कारण वाचनामुळे जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही."
या कार्यक्रमात प्रगती गायकवाड (बी.एस्सी. द्वितीय वर्ष), अर्जुन तेलंग (बी.ए. प्रथम वर्ष), अत्तार सादिया (बी.ए. प्रथम वर्ष), वैशाली पायवाडे (बारावी कला), गौरी ददापुरे (बारावी वाणिज्य), वसुंधरा भंडे (अकरावी वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी ग्रंथातील लेख, कविता आणि डॉ. कलाम यांच्यावरील लेखांचे अभिवाचन केले.
तसेच प्रियंका पाटील (बी.ए. प्रथम वर्ष) आणि संस्कार मठपती (बी.एस्सी. तृतीय वर्ष) यांनी वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास डॉ. वर्षा निरगुडे, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागनाथ केंद्रे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. म.ई. तंगावार यांनी केले, तर आभार ग्रंथपाल प्रा. अजित रंगदळ यांनी मानले.
Latur, Latur | Oct 15, 2026