
ब्रेकिंग - लातूरमध्ये माणुसकीला काळीमा; तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण, एकाला अटक
लातूर : लातूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाला नग्न करून पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्यासोबत अत्यंत अमानुष आणि क्रूर कृत्य केल्याचे समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आरोपींनीच मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याची दोन स्वतंत्र पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून उर्वरित तीन ते चार आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना काही महिन्यांपूर्वीची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मारहाण नेमकी कोणत्या कारणातून झाली, व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा उद्देश काय, याचा सखोल तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Latur, Latur | Oct 18, 2026