
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटी प्रवास व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल
राज्यात ५१ लाख नोंदण्या; ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रांद्वारे सुरू कार्ड वाटप मोहिम
प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे राज्यभरात NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग आला असून लाभार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवाशांनी कोणताही विलंब न करता आपली नोंदणी आणि कार्ड सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
NCMC स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा आर्थिक शोषण सहन केले जाणार नसल्याचा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्ड विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे.
या डिजिटल उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सवलतींची पडताळणी आणि तिकीट व्यवहार अधिक वेगवान होणार आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे एसटी सेवांमध्ये आधुनिकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
#NCMCSmartCard #MSRTC #STMahamandal #MaharashtraTransport #PratapSarnaik #SmartCard #DigitalMaharashtra #MahilaPravasi #JyesthaNagrik #AmrutJyesthaNagrik #STBus #PublicTransport #DigitalTravel #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiNews #TransportDepartment #VeerMaharashtraNews #SmartMobility #NCMCIndia #MaharashtraGovernment #TravelUpdate #STUpdates #DigitalTransformation #PassengerServices #MarathiNews #LatestNews #Maharashtra #NCMCCard #statetransport