
लातूरमध्ये पाण्यावरून कडक निर्बंध! टँकरने पाणी विक्रीस बंदी, बेकायदा बोअरवेल खोदले तर मशीन जप्त होणार
लातूर : जिल्ह्यात पर्जन्यतुटीमुळे भूजल पातळीत ४.५८ मीटरने घट झाली आहे. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्याला पुढील एक वर्षासाठी पाणीटंचाई क्षेत्र घोषित केले आहे.
महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात शेती किंवा औद्योगिक वापरासाठी ६० मीटरपेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटर परिसरात नवीन बोअरवेल खोदता येणार नाही.
सार्वजनिक जलस्रोतापासून १ किलोमीटर अंतरातील खासगी विहिरी व बोअरवेलमधून व्यावसायिक किंवा सिंचनासाठी पाणी उपसण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अशा विहिरी अधिग्रहित करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
विनापरवाना भूजलाची विक्री व टँकरद्वारे वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बोअरवेल रिग मशीन मालकांना ३० दिवसांच्या आत तहसील कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करून खोदकाम केल्यास यंत्रसामग्री जप्त करण्यात येणार आहे.
या आदेशाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासनामार्फत केली जाणार असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कलम ५२ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून दंड व कारावासाची कारवाई केली जाणार आहे.
Latur, Latur | Oct 17, 2026