
चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे घडलेल्या बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा घटनेनंतर फरार झाला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा विविध ठिकाणी तपास करत होती.
दरम्यान, फरार आरोपी कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी विशेष पथक तयार करून कर्नाटकात रवाना केले.
पथकाने बसवकल्याण परिसरात सापळा रचून आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाने तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, पुढील तपास आंबी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. आरोपीच्या चौकशीतून खून प्रकरणातील इतर बाबींचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
#ChinchpurKhurd #Paranda #DharashivPolice #LCBOperation #CrimeNews #MaharashtraNews #AmbiPoliceStation #KarnatakaArrest #VeerMaharashtraNews #BreakingNews #Dharashiv #PoliceAction #CrimeInvestigation #Justice #maharashtrapolicefans