पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
Panvel, Raigad | Oct 17, 2025 पनवेल महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत फटाके व पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. आपण वैश्विक वातावरणीय बदलास सामोरे जात आहोत. वातावरणीय बदलाच्या आणि तापमानवाढीच्या अनेक कारणांपैकी हवेचे प्रदूषण हे महत्वाचे कारण आहे. विविध सण ,उत्सव प्रसंगी आपण फोडत असलेल्या फटाक्यांमुळे कार्बन डायऑक्साईड व सल्फरचे तसेच इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढत असून, कार्बन डायऑक्साईड व सल्फरच्या वाढत्या प्रमाणामुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे.