नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणूकीची सज्जता नियोजनबध्द रितीने करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 28 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून 1 ते 27 प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा 4 जागांकरिता व 28 व्या प्रभागामध्ये अ,ब,क अशा तीन जागांकरिता नागरिकांना मतदान करावयाचे आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे तसेच निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.