*lरक्तदान सामाजिक दायित्व व बांधिलकी संवर्धनाचा उपक्रम- डॉ. अरविंद सोमनाथे
Seloo, Wardha | Oct 15, 2026 *रक्तदान सामाजिक दायित्व व बांधिलकी संवर्धनाचा उपक्रम* ------ डॉ. अरविंद सोमनाथे *माजी विद्यार्थी संघटना द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन* सेलू (तालुका प्रतिनिधी): रक्तदान करणे हा सामाजिक दायित्व व बांधिलकी संवर्धनाचा अभिनव तथा मानवतावादी उपक्रम आहे. आपण आपल्या समाजाचा एक घटक म्हणून गरजवंताला प्रसंगी रक्तदानाच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य करू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा रक्तदान करावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ अरविंद सोमनाथे यांनी केले. माजी विद्यार्थी संघटना यशवंत महाविद्यालय द्वारा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. संदीप काळे होते तर उद्घाटक म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ अरविंद सोमनाथे आणि प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री सतिश काटवे, अश्विनी पांडे (संचालक लायन्स ब्लड बँक वर्धा) उपस्थित होते. तसेच याप्रसंगी ब्लड बँकची वैद्यकीय चमुतील सदस्य सूरज घायवट, सपना राऊत, उझमा नाज, प्राजक्ता भांगे व जनसंपर्क अधिकारी शुभम सर यांची उपस्थिती होती. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. अर्चना बारंगे यांनी केले. ब्लड बँकच्या संचालक अश्विनी पांडे यांनी असे स्पष्ट केले की, रक्तदान विषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याविषयी जागृतता निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास नागरिकांचा दृष्टिकोन बदलून मनातील भीती सुद्धा कमी होईल. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संदीप काळे यांनी असे सांगितले की, युवकांनी आजच्या काळाची आवश्यकता म्हणून रक्तदान करणे आवश्यक आहे.