पनवेल: तळोजा कारागृहात खाकीच ठरली तस्कर
Panvel, Raigad | Jun 25, 2026 तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहातील एका शिपायालाच अंमली पदार्थांसह रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय आदित्य शेलार हा तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिपाई म्हणून कार्यरत असून सोमवारी दुपारी दिवसपाळीची ड्युटी बजावत होता. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका हवालदाराने त्याची तपासणी केली. झडतीदरम्यान त्याच्या खिशात अंमली पदार्थांचा साठा आढळून आला.