श्रीवर्धन: दरवर्षी आभाळ फाटतंय, पण कोकणचा रांजण कोरडाच
कोकण विभागीय टंचाई कृती आराखडा 2026 नुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांत सद्यस्थितीत 1,020 गावे आणि 3,010 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष असून, वाढत्या उन्हाळ्यासह या गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. यंदा टंचाईची तीव्रता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. कोकणाला निसर्गाची विपूल पावसाची इतकी मोठी नैसर्गीक देणगी लाभूनही कोकणी माणूस तहानलेला राहतो, हे नियोजनशून्यतेचे उदाहरण आहे. याच वास्तवातून आता 'दरवर्षी आभाळ फाटतंय, पण कोकणचा रांजण कोरडाच' अशी म्हण ग्रामीण भागात रूढ झाली आहे.