पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ खासगी लक्झरी बसला आग
प्रवासी सुखरूप; चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला रविवारी (२४ ऑगस्ट) मध्यरात्री २.१० वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलाजवळ भीषण आग लागली. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा टायर फुटल्याने ही घटना घडली. क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढा घालून भडका उडाला. चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, एम एच ०२ एफ जी २१२१ क्रमांकाची बस आणि प्रवाशांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.