खालापूर: हाळखुर्द गावातील १२० वर्ष जुनी उर्दू शाळेचे नूतनीकरण, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
खालापूर तालुक्यातील हाळखुर्द गावात १२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास संपन्न झाले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ७६ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या ऐतिहासिक शाळेला नवसंजीवनी लाभली आहे. मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या हाळखुर्द गावातील जुनी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने तिच्या नूतनीकरणाची गरज तीव्र होती. सामाजिक कार्यकर्ते हुसेन खान, ग्रामपंचायत उपसरपंच अजीम मांडलेकर आणि ग्रामस्थांनी या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आमदार थोरवे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आणि आज गावातील मुलांना नव्या, प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.