पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी जागृतीसाठी ग्रीन फेस्टिवल स्पर्धा संपन्न
Panvel, Raigad | Oct 16, 2025 पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत ग्रीन फेस्टिवल फटाकेमुक्त दिवाळी या उपक्रमांतर्गत आज गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्यावरती महापालिकेचा नेहमी कल असतो, त्यानूसार उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ग्रीन फेस्टिवल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्व पटवून देण्यासाठी आज लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे येथे पणती सजावट, रांगोळी स्पर्धा, कंदील बनवणे व तोरण बनवणे अशा आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.