महागाव तालुक्यातील वाकान परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा बोकड ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना दि. ११ जानेवारी (रविवार) रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी इंदल आडे यांचा बोकड जंगलालगत असलेल्या परिसरात चरायला गेला असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून बोकड ठार केला. या हल्ल्यात शेतकऱ्यांचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.