
१०० टक्के अनुदानावरील सोयाबीन बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांनी तातडीने लाभ घ्यावा
प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (गळीतधान्य-सोयाबीन) योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने बियाणे वितरणाचे नियोजन पूर्ण केले असून पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या अधिकृत वितरकांकडून त्वरित बियाण्यांची उचल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे निगम (NSC) यांच्या अधिकृत वितरकांमार्फत तालुकानिहाय बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे उचलताना लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि फार्मर आयडी (Farmer ID) क्रमांक सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी लाभार्थी निवडल्या गेल्या आहेत. संबंधित महिला शेतकरी स्वतः वितरकाकडे जाऊ शकत नसल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बियाणे आणण्यासाठी पाठवता येणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थी महिला आणि बियाणे घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डच्या प्रती जमा कराव्या लागतील.
महाडीबीटीवरील नोंदणीनुसार एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एका हेक्टर क्षेत्रासाठी ७५ किलो बियाणे अनुज्ञेय राहणार आहे. शासनाच्या नियमानुसार २५ किलोच्या बॅगा फोडून दिल्या जाणार नसल्याने शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त रक्कम भरून संपूर्ण बॅगा घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
अनुदानाबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या आतील सोयाबीन वाणासाठी प्रति किलो ११० रुपये तर पाच ते आठ वर्षांच्या आतील वाणासाठी प्रति किलो ८६ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार वितरकांना नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या अधिकृत कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधून १०० टक्के अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक तसेच कृषी विभागाने केले आहे.
#सोयाबीन #SoyabeanSeeds #राष्ट्रीयखाद्यतेलअभियान #कृषीविभाग #धाराशिव #शेतकरी #MahaDBT #अनुदानितबियाणे #कृषीबातमी #Farmers #AgricultureNews #SoyabeanDistribution #महाराष्ट्रशेती #शेतकरीहित #वीरमहाराष्ट्रन्यूज #Dharashiv #AgricultureDepartment #Mahabeej #NSC #GovernmentScheme
#धाराशिव #सोयाबीन #शेतकरी #कृषी #अनुदान #MahaDBT #वीरमहाराष्ट्रन्यूज #BreakingNews #Maharashtra #FarmersFirst